बेरोजगारी हटाओ , गरिबी हटाओ !
वर्तमानपत्राबरोबर सकाळचा चहा ही माझी नित्यनियमाची सवय . परवा असेच सकाळी पेपर वाचायला घेतला तर त्यामध्ये बातमी : ' स्पर्धापरीक्षा देणाऱ्या मुलांचा मोर्चा ’ आणि वाचून पाहिले तर समजले की किती मोठ्या प्रमाणात नोकरीची समस्या ही आजच्या तरूणाला भेडसावत आहे . काही तरूण गेली कित्येक वर्षे या परीक्षा देत आहेत तर काही यामध्ये उत्तीर्ण होऊनही त्यांच्या हातामध्ये नोकरी नाही . खरंच ! बेरोजगारी हा एक देशामध्ये राहणाऱ्या कोट्यवधी तरूणांच्या डोळ्यांसमोरील एक ज्वलंत प्रश्न बनलेला आहे .
जर आपणाला आपल्या देशाचा विकास घडवायचा असेल तर बेरोजगारी या विषयावर आपणाला विचार करणे गरजेचे आहे . बेरोजगारी म्हणजे व्यक्तीला कामाची इच्छा असून , क्षमता असूनदेखील काम न मिळणे ; भारतातील सांख्यिक लोकसंसख्येला आपण रोजगार देऊन त्या लोकसंख्येचे रूपांतर गुणवत्तापूर्ण लोकसंख्येत केले तर देशाचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही .
बेरोजगारीला कारण म्हणजे आपली वाढलेली लोकसंख्या ही इतकी भरमसाठ वाढली की लोकसंख्यावाढीच्या वेगाप्रमाणे रोजगार उपलब्ध होत नसताना दिसत आहे आणि तरूणांना रोजगार न मिळाल्यानेच देशामध्ये गरिबी , दारिद्रयता वाढताना दिसते आहे . श्रीमंत माणूस अतिश्रीमंत होताना दिसत आहे व गरीब अतिगरीब .
लोकसंख्या वाढ हे एकच कारण बेरोजगारीसाठी कारणीभूत मानणे चुकीचे आहे . काही आर्थिक व सामाजिक कारणे ही यासाठी जबाबदार आहेत . शेती हे एक आर्थिक कारण म्हणता येईल . कारण भारत हा एक शेतीप्रधान देश आहे . भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीमध्ये काम करताना वा शेतीवर अवलंबून आहे . पण भारतीय शेतीची पध्दत अजूनही पारंपरिकच आहे . म्हणून आधुनिक तंत्राच्या साहाय्याने जिथे 2 व्यक्ती काम करू शकतात तेथे 4 ते 5 व्यक्तींना काम करावे लागत आहे व उत्पन्नामध्येदेखील वाढ नाही , यामुळे छुप्या बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे . तसेच परपरांगत चालत आलेले हस्तोद्योग व कुटिरोद्योग बंद पडल्यामुळे त्यांनादेखील शेती हाच पर्याय उपलब्ध असे वाटले व ते शेतीकडे वळतात . बेरोजगारीला कारण यांत्रिकी उद्योग आहेतच पण त्या बरोबर आहे तो पायाभूत सुविधांचा न झालेला विकास , उद्योग वाढवायचे तर रस्ते , दळणवळणाची साधने , वीज , पाणी यांची सुविधा नसेल तर हे घटक उद्योगांच्या विकासाला अडथळे होतात . मग ते लघुउद्योग , कुटिरोउद्योग हे बंद पडल्यामुळे त्या कारागिरांची अवस्था नोकरी नाही आणि व्यवसाय नाही , अशी झालेली दिसते . मग युवकाच्या तोंडून उद्गार बाहेर पडतात ,
कोणी नोकरी देता का नोकरी !
कोणी नोकरी देता का नोकरी !
‘ शिक्षणपद्धती ' हे एक कारण बेरोजगारीसाठी मानता येईल . आपली शिक्षणपध्दती ही फक्त गुणपत्रिकेशी निगडित आहे . शिकवणारे शिक्षक व शिकणारा विद्यार्थी दोघांचा एकच ध्यास गुणपत्रीकेतील गुण त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देताना दिसतात . त्यांचा सर्वांगीण विकास , कौशल्य विकास यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि याचा परिणाम असा की पहिल्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना तर नोकरी मिळते . पण द्वितीय , तृतीय या श्रेणीतील मुलांना ना नोकरी मिळते ना कौशल्याच्या अभावामुळे व्यवसाय करता येतो आणि यातूनच सुशिक्षित बेकारीचे प्रमाण वाढते व यामधील काही सुशिक्षित निम्न दर्जाच्या बेरोजगारीमध्ये समाविष्ट होतात . भारतामध्ये शिक्षण या घटकांवर सरकारकडून अपेक्षेपेक्षा कमी खर्च केला जातो . शैक्षणिक पध्दतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कमी प्रमाणात होतो म्हणून भारतीय तरूण हा विकसित देशाच्या तुलनेत म्हणजेच तेथील तरुणांच्या बरोबरीने विकास करताना दिसत नाही .
आपल्या देशातील जातीव्यवस्थेमुळे देखील बेरोजगारी वाढताना दिसत आहे . परंपरागत चालत आलेल्या रूढी ' जसे कोणी काय काम करावे त्यामुळे देखील एखाद्या समाजातील तरुणाची क्षमता ही उच्च कार्य करण्याची असूनदेखील जातीच्या एका कारणामुळे त्याला ती मिळत नाही , तसेच अजून एक कारण आहे ते म्हणजे पुरूषप्रधान संस्कृती . यामुळे कुटुंबातील स्त्रीचे काम हे फक्त चूल आणि मूल सांभाळणे एवढेच समजले जाते आणि स्त्रियांचा लोकसंख्येमधील वाटा हा खूप मोठा असल्याने याच कारणामुळे समाजातील मोठा घटक हा रोजगारापासून वंचित राहतो .
अशा अनेक कारणांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे आणि म्हणतात ना की , ' रिकामे मन हे सैतानाचे घर असते . ' तो प्रकार देशामध्ये वाढताना दिसत आहे . व्यसनाधीनता , गुन्हेगारी अशा अनेक सैतानांचा जन्म होताना दिसत आहे . काम न मिळाल्याने मनात असलेला असंतोष , कुटूंबियांकडून सतत विचारले जाणारे प्रश्न , आर्थिक प्रश्न यांकारणाने तरूणाई मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी मार्गाकडे वळताना दिसत आहे . अशा तरुणांना दहशतवादी बनवण्याचे काम दहशतवादी संघटनांकडून केले जाते .
बेरोजगारी हटवण्यासाठी सरकारचे प्रयत्न स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालू आहेत पण भरमसाठ लोकसंख्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी असलेली संरचना , प्रशासकीय व सामाजिक घटक यामुळे सरकार अपयशी ठरताना दिसते . सरकारने तरीही ' महात्मा गांधी रोजगार योजना ' , ' संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ' ‘ स्वर्णजंयती ग्राम स्वरोजगार योजना ' अशा अनेक योजनांमधून प्रयत्न सुरू ठेवले आहेत .
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसंख्येच्या मानाने रोजगार उपलब्ध करून देणे ही कोणत्याही सरकारला अशक्य असणारी गोष्ट आहे . म्हणून मोठ्या प्रमाणात स्वकौशल्याचा विकास करून स्वबळावर छोटे व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगारीत होणे हा अतिशय चांगला उपाय मानला जाईल . माननीय प्रधानमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे ' स्किल डेव्हलपमेंट ' यावर भर देणे आणि यासाठी मदत करणाऱ्या ' मुद्रा ' सारख्या सोयीसुध्दा सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत . हे लक्षात घेऊन देशातील तरूणाईने स्वत : चा व स्वत: बरोबर देशाचा विकास करावा .
कौशल्यांचा खरा विकास ,
बेरोजगारीचा होईल नाश .
0 Comments