आजची स्त्री

 आजची स्त्री

वर्षातून एकदा महिला दिवस उजाडतो आणि तो साजरा करताना स्त्रीच्या शक्तीचा साक्षात्कार धरतीवरील सर्वांना होतो. अर्थात नकळत त्यांच्याकडून या ना त्या क्षेत्रात स्वीच्या कामाची दखल घेतली जाते. स्त्रीला समाजाचा अविभाज्य व अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जात आहे. अशा या स्त्रीचा इतिहास मात्र वेगळाच आहे. प्राचीन काळात ती समाजात व कुटुंबात अग्रस्थानी होती. पण कालांतराने पुरुषप्रधान संस्कृतीने महिलांवर अशी बंधने आणली. त्यांच्यावरील निर्बंधामुळे त्या ना घराबाहेर पडल्या ना त्यांच्या डोक्यावरचा पदर ढळला. उलट त्या शिक्षणापासून वंचित की राहिल्या. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी त्या रीती-रिवाज, रूढी, परंपरा यांतच गुरफटून राहिल्या होत्या. पणे सावित्रीबाई यांच्यासारख्या धाडसी स्त्रियांनी मुलींची शाळा काढून समाजाचा छळ सोसून मुलींना साक्षर केले. त्यांना शिक्षणाचा दृष्टिकोन दिला. त्यातूनच अनेक स्त्रियांनी आवाज उठवून स्त्रीशिक्षणासाठी जागृत केले. स्त्रियांनीदेखील शिक्षणाला सुरुवात केली.

आज तिचे वेगळे प्रतिबिंब दिसते. आजची स्त्री साक्षर आहे. स्वतःला सुशिक्षित करून आवाज उठवून स्वतः च्या मनाप्रमाणे स्वातंत्र्य घेऊन जीवन जगत आहे. ती कुठल्याही क्षेत्रात मागे राहिली नाही. तिच्या परिवारातले लोकही तिच्या साक्षरतेचे महत्त्व जाणून तिला साक्षर व संरक्षणाच्या शिक्षणातून परिपूर्ण बनवत आहेत.

ज्योतिबांच्या म्हणण्याप्रमाणे एक स्त्री शिकली की सारे घर शिकते. हे त्यांचे मत स्त्रियांनी खरे करून दाखवले आहे. स्त्रियांनी शिक्षण घेणे कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने गरजेचे आहे, हे जाणून स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक संस्था पुढे आल्या. त्यामुळे वयाचे बंधन सोडून या देशातीलच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील स्त्रिया शिक्षण घेऊन साक्षर झाल्या आणि त्यातूनच आजची स्त्री जगासमोर वावरू लागली आहे. तिचे वागणे-बोलणे सफाईदार झाले. हरणीच्या गतीने ती धावतेय. घराचा उंबरठा ओलांडून ती डॉक्टर, इंजीनिअर, वकील, वैमानिक, ऑफिसर अशा उत्तुंग भरारी घेणाऱ्या क्षेत्रांत चमकू लागली आहे. क्षमतेप्रमाणे उपजीविकेसाठी लहानशा व्यवसायातून मोठमोठ्या नोकऱ्यांपर्यंत तिने पल्ला गाठला आहे. ज्ञान विज्ञानाच्या सहाय्याने राहणीमान उच्च केली आहे. कंबर कसून संकटाशी सामना देऊन सुखसोयीनी युक्त आरामदायी जीवन ती जगत आहे. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवण्याच्या जाणिवेने ती मनोमन सुखावली आहे. अर्थात तिची आई, आजी, पणजी यांनी भोगलेला भोग ती भोगत नाही. आधुनिक काळात ती जगत आहे. यंत्रांचा वापर ती करत आहे. मनासारखी प्रगती ती करत आहे व मनाला न मारता सर्व सुखे ती उपभोगत आहे.

 आधुनिक स्त्री जगण्यासाठी स्वतःच्या पायावर हिमतीने उभी राहते. परिस्थितीशी झगडणाऱ्या उपेक्षित स्त्रियांना जगण्याचे हक्क मिळवून त्यांच्या सोबत उभी राहते. त्यामुळे निरक्षर स्त्रियासुद्धा वेगळ्या अर्थाने स्वतंत्र असल्याचे जाणवत आहे. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून ती काम करत आहे. खेडेगावांपासून मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडचे समाजजीवनाचे चित्र ती बदलत आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या परिवर्तनाची चळवळ दोन अडीच दशक तिने चालवली. त्या मुळे झालेल्या परिवर्तनाने वेगळा आकार घेतला. बघता बघता घराचे दारिद्र्य कसे घालवायचे याची किल्ली प्रत्येक स्त्रीच्या हाती आली आहे. वकील, परिचारिका, कारकून, लेखिका, बँक कर्मचारी, पोस्टमन, पोलिस अधिकारी ते या देशाची पंतप्रधान या सर्व क्षेत्रांत तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. ती स्वच्छता, आरोग्य, शिक्षणाचे महत्त्व जाणते. घरकाम, बाजारहाट, मेहनतीचे काम यात ती यशस्वी झाली आहे. आपल्या पंखांना दिशा देण्यात ती यशस्वी ठरली आहे. स्वतःच्या पायांवर ती उभी राहू शकते. योग्य निर्णयक्षमतेमुळे तिच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पदवीधर होऊन नोकरी व्यवसाय करून सन्मानाने जगण्यात तिला आनंद मिळत आहे.

सतीची चाल, अंधविश्वास किंवा बुरसटलेले विचार, जुने चुकीचे रीतीरिवाज ती नाहीसे करू पाहत आहे. अशी ही स्त्री कुठेही कमी पडत नाही. मातृत्व हे तिला निसर्गाने दिलेले वरदान सांभाळताना ती कुठेच कमी पडत नाही. उलट झाशीच्या राणीप्रमाणे लढून बाळाचे संरक्षण करते. मूल नसलेली स्त्री मुलगी दत्तक घेण्यास आवडीने पुढे सरसावत आहे. इतके तिला स्त्री जीवनाचे महत्व समजले आहे. स्वतःच्या घरट्याला ती शत्रूच्या हातात जाऊ देत नाही की आपल्या घरट्यात शत्रूला घुसू देत नाही. तिच्या संसाराचे गणित सोडवायला तिच्यामध्ये शक्तीचा मोठा जोश आलेला आहे. अशी ही स्त्री आजही अनंत काळाची माता आहे आणि असेल.

 अशा या 'स्त्री'ला माझा सलाम.

Post a Comment

0 Comments